गोखले कुळात ऐतिहासिक काळापासून ते आजच्या वर्तमान काळापर्यंत अनेक व्यक्तींनी विविध क्षेत्रांत अत्यंत महत्त्वाचे योगदान देऊन आपल्या नावाबरोबरच गोखले घराण्याचे नाव उज्ज्वल केले आहे. गोखले घराण्यातील हे सर्व थोर व्यक्ती कुलभूषण ठरले आहेत, त्यांची संक्षिप्त माहिती येथे देत आहोत.
लवकरच गोखले घराण्यातील या कुलभूषणांची अद्ययावत सूची या विभागात उपलब्ध होईल.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखले हे आधुनिक भारताचे एक महान नेते, नेमस्त पक्षाचे अध्वर्यू आणि थोर समाजसेवक होते. त्यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी रत्नागिरीतील कोतळूक येथे झाला. अठराव्या वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीचा मार्ग न स्वीकारता स्वार्थत्यागपूर्वक देशसेवा करण्याचे व्रत घेतले. विसाव्या वर्षी ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक झाले आणि त्यांनी ‘सुधारक’ पत्राचे सहकारी संपादक म्हणून काम सुरू केले. ते सार्वजनिक सभेचे चिटणीस (१८८७) व सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले आणि पुढे १८९१ मध्ये ते परिषदेचे चिटणीस तसेच राष्ट्रसभेचे चिटणीस झाले.
प्रांतिक विधिमंडळात प्रवेश केल्यानंतर चार वर्षांतच ते केंद्रीय विधिमंडळात निवडून गेले. १९०५ साली ते वाराणसी येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांनी १९०६ मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली.
१९०२ मध्ये गोखले मध्यवर्ती कायदेमंडळावर निवडून गेल्यावर त्यांनी अर्थसंकल्पांवर जे भाषण केले, त्यामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले. त्या विधिमंडळात त्यांनी अर्थसंकल्पावर १२ भाषणे केली. त्यातून तत्कालीन भारताच्या राजकीय, आर्थिक, शैक्षणिक वगैरे प्रश्नांचा उत्कृष्ट ऊहापोह त्यांनी केला. भारताची शेती, शेतकर्यांच्या अडचणी, आयात-निर्यात, करभार, उद्योग, रुपयाचे पौंडाशी असलेले नाते, लष्करावरील खर्च असे अनेक विषय त्यांनी व्यासंगपूर्वक हाताळले. अशा या थोर समाजसेवकाचे १९ फेब्रुवारी १९१५ रोजी निधन झाले.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) व्ही.एस.एम., ए.व्ही.एस.एम., पी.व्ही.एस.एम.
भारतीय हवाई दलात जून १९६८ मध्ये फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त झालेले एअर मार्शल भूषण गोखले यांनी विविध लढाऊ आणि ट्रेनर विमानांवर ३,५०० तासांहून अधिक उड्डाण केले आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी सक्रिय ऑपरेशन्समध्ये भाग घेतला होता.
ऑपरेशन्ससाठी सहाय्यक हवाई दल प्रमुख म्हणून, एअर मार्शल गोखले यांनी ऑपरेशन पराक्रम दरम्यान हवाई ऑपरेशन्सच्या नियोजन आणि अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते हवाई मुख्यालयात हवाई दलाचे उपप्रमुख होते. निवृत्तीनंतर, एअर मार्शल भूषण गोखले यांची भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) चे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य आहेत. त्यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड या दोन संरक्षण सार्वजनिक उपक्रमांच्या मंडळावर नामनिर्देशित सदस्य म्हणूनही काम केले आहे. ते एअर वॉर कॉलेज, यूएसएचे माजी विद्यार्थी आणि एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे फेलो आहेत.
त्यांना देशाच्या अमूल्य सेवेसाठी वायुसेना पदक (१९९०), अतिविशिष्ट सेवा पदक (२०००) आणि परम विशिष्ट सेवा पदक (२००७) अशा महत्त्वपूर्ण सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.
विष्णु भिकाजी गोखले
आधुनिक भारताच्या उभारणीत अनेक ज्ञात अज्ञात महापुरुषांचा सहभाग आहे. यातीलच एक नररत्न म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात जन्मलेल्या निर्भीड, संन्यासी विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्य अढळ अशा ध्रुव ताऱ्यासारखे सर्वांना मार्गदर्शक आहे.
जातीभेद निर्मूलन, बाल विवाह, विधवा विवाह, शिक्षण, कामगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी हिंदू समाजाचे आग्रहपूर्वक, पोटतिडकीने प्रबोधन केले. त्यासाठी निंदानालस्ती , उपेक्षा सहन केली. जातिभेदांमुळे आपला समाज विस्कळीत झाल्याने आपण पारतंत्र्यात गेलो असा वस्तुनिष्ठ विचार मांडला. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी चालविलेल्या हिंदूंच्या धर्मांतराचा आपल्या लेखणी आणि वाणीने कठोर प्रतिकार केला.
भारताचे उत्थान वेदोक्त धर्माच्या – वेद आणि उपनिषदांनी सांगितलेल्या चिरंतन जीवनमूल्यांच्या आचरणातून होईल असा त्यांचा विश्वास होता.
विष्णुबुवांनी त्यांच्या जन्मगावी शिरवली येथे श्रीदत्तगुरूंच्या पादुका स्थापन केल्या आहेत.

कुलभूषण